मघाशीच बाळकडू हा चित्रपट पहिला. या चित्रपटावर आणि पर्यायाने शिवसेनेच्या विचारधारेवर लिहिणे गरजेचे वाटले. चित्रपटाकडे मी कहाणी व दिग्दर्शन अश्या दृष्टीने पाहू नाही शकत. अर्थात त्या बाबत माझे ज्ञान तोडके आहे. मी चित्रपटातून प्रतीत होणारी विचारधारा यावर लिहीणार आहे.
* परप्रांतीय
चित्रपट हा बाळासाहेबांचे आवाज ऐकू येणाऱ्या एका तरुणाची कहाणी मांडतो. पहिल्यांदा शिक्षक असणारा तरुण नंतर मात्र संघर्ष करण्याच्या भूमिकेत उतरतो. इथ संघर्ष आहे तो मराठी भाषा आणि माणूस यांच्या मुंबईतील अस्तित्वाचा. मुंबईत येणारे परप्रांतीय हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला तो शिवसेनेमुळे शिवसेनेची परप्रांतीयांबाबत ची भूमिका हि नक्कीच चुकीची आहे. आणि त्यांचा यावरील उपायही. मुळातच कोणत्याही भारतीय व्यक्तीला भारतभर कुठेही जाण्याचे, उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या व्यक्तींना मारहाण किंवा त्यांनी मराठीतच बोलाव हि अपेक्षा अनाठायी व चुकीची आहे. परंतु मराठी माणसाला माझ्यावर किती अन्याय होतोय! अस दाखवण्यातच सुख लाभत असावे असे वाटतय. मुंबईतील मराठी माणसांचा टक्का कमी होतोय याला मराठी मानसिकता किती कारणीभूत आहे याचा एकदा विचार करायला नको? आज आमच्या गावोगावी गवंडी काम करणारे चायनीज च्या गाड्या टाकणारे परप्रांतीय तरुण एकीकडे आहेत तर दुसरीकडे त्याच गावाच्या कट्ट्यावर बसणारे सुशिक्षित बेकारही आहेत. यावर विचार करायला नको का? पण आपण मात्र त्यांचीच कशी चूक हे सिद्ध करायला टपलेलो आहोत. तेही लोक जे आपल्या राज्यात येतात तेही सुखासुखी येतात किंवा त्यांना फार आनंद मिळतो असे नाही. अर्थात काही लोक इथ येऊन श्रीमंतही झालेले आहेत. मात्र घर आपली जन्मभूमी सोडण्याच दुखः फार वाईट असत. मी एकदा सहज साताऱ्यातील एका चायनीज च्या गाडीवाल्याला विचारल कि बाबा कारे असे चायनीजचे गाडे तुम्ही तुमच्या राज्यात का लावत नाही? तो म्हणाला कि भाई रस्ते पे पकाया हुवा और महंगा चावल लेणे इतनी अच्छी स्थिती हमारे लोगोंकी नही है! तो वहा गाडा लगाके ये लेगा कौन? अतिशय गरीब परिस्थिती लोकांना स्थलांतर करायला भाग पाडते. याचाही विचार केला पाहिजे.
* हिंसा
मात्र याचा विचार न करता याविरोधात उभे ठाकणारे लोक मग कोणत्या मार्गाचा वापर करतात हेही महत्वाच. आपल्या मागण्या आपले हक्क मिळवण्यासाठी झगडण्याचा एक सनदशीर मार्ग आपल्या देशात उपलब्ध आहे. मात्र हे सर्व डावलून बाळ साहेब आपला लढा कानाखाली वाजवून सुरु करतात. अर्थात शाळा बंद विरुद्धचा लढा तेवढा असहकाराचा दिला आहे तो चित्रपटातील सन्माननीय अपवाद आहे. कारण नंतर मात्र हे बाळ सर सगळा लढा हा हिंसेनेच हाताळतात त्यातूनच न्यूज चॅनेलच्या ऑफिस वरील हल्ला होतो. तोडफोड होते. आता हा मार्ग किती धोकादायक आहे हे आपल्याला ठाऊक आहे. हिंसेवर उभी राहणारी क्रांती किती धोकादायक असते याचा अनुभव जगाला फ्रेंच राज्यक्रांती मध्ये आला. त्यामुळे तत्वे योग्य असण्याबरोबरच त्यासाठीचा लढादेखील योग्य मार्गाने दिला गेला पाहिजे.
* हुकुमशाही
* हुकुमशाही
या चित्रपटातच बाळ सरांची प्रेयसी हिच्या सोबतच्या संवादामध्ये हिटलरची डाॅक्यूमेंटरी करताना या देशाला आता हुकुमशाहीचीच गरज आहे असे बाळ सर व्यक्त करतात. नंतरही काही संवादातून कायद्यावरील अविश्वास व ते धुडकावण्याची प्रवृत्ती दिसून येते हे सर्व अतिशय चुकीचे आहे. हुकुमशाही ही नेहमीच वाईट असते. हिटलर आणि मुसोलिनीच्या हुकुमशाहीने जगभरातील लाखो लोकांचे बळी घेतले. लेनिन आणि माओ यांनी देखील लाखो लोकांचे बळी घेतले. हुकुमशाही हि अन्यायीच असते असे नाही तुर्कस्थान सारखा अपवादही आहे. मात्र एककेंद्री सत्ता हि गुलामी निर्माण करणारी असण्याची शक्यता असते. आणि प्रगतीसाठी देखील हुकुमशाहीच जास्त फायद्याची हेही काही बरोबर नाही. त्यामुळे हुकूमशाहीचे समर्थन देखील चुकीचे आहे. हुकुमशाही हि अनियंत्रित असते यातच जास्त धोका आहे.
मात्र अशी चुकीची विचारसरणी मांडणारा हा चित्रपट आहे त्यामुळे अश्या विचारांकडे दुर्लक्ष करून मराठी माणसाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने पाऊले टाकणे हे आपल्या सारख्या सुजाण लोकांचे कर्तव्य आहे. आपल्या अस्मिता आपल्या भाषे, प्रांतापूरत्या मर्यादित न करता व्यापक व्हावे. अभिमान असावा माज किंवा गर्व नाही हीच अपेक्षा....... जय महाराष्ट्र